श्रावण



श्रावण
" श्रावण" , एवढ्या एका शब्दांनी  किती साऱ्या भावना मनात उचंबळून येतात आणि किती साऱ्या स्मृती  जाग्या होतात. श्रावण येतोच मुळी वाजत गाजत. आषाढाच्या सतंत धारेनंतर, श्रावणाची रिमझिम आणि थोडसे का होईंना, पण घडणारे सूर्य दर्शन,  मनाची मरगळ  जशी गळूनच जाते.
हाच श्रावण घेवून येतो,  अनेक सुगंध, देवघरातील गंधाचा, फुलांचा, उदबत्तीचा, धुपाचा, शांत पणे तेवणाऱ्या  समईचा आणि ठेवणीतल्या शालूचा, किंवा पैठणीचा  आणि त्या वरील अत्तराचा,
स्वयपाकघरातून  येतो तो वास, पुरण- वरणाचा, सत्य- नारायणाच्या प्रसादाचा किंवा नारळी भातामध्ये घातलेल्या सुक्यामेव्याचा आणि वेलदोडाचा
"श्रावणात घन निळा", " श्रावण  मासी  हर्ष मानसी" , " अब के सजन सावन मे" , " आया सावन झूम के" अश्या अनेक  गाणी, काव्ये मनात रुंजी घालू लागतात.  सृष्टी जणू पाचुनि सजवलेला शालू नेसते. रंगीबेरंगी फुले, पाने हि शोभा अजूनच वाढवतात. उन पावसाच्या  खेळातून उमटलेले इंद्रधनू , डोळ्यांचे पारणे फेडते आणि अनेक कलाकारांना स्फुर्तीच मिळते नव्या साहित्य, चित्र कृती निर्माण करण्यासाठी
या श्रावण महिन्याशी असंख्य स्मृती जोडल्या जातात, मला आठवते ते म्हणजे असंख्य कहाण्या . सोमवारची कहाणी,  मंगला गौरीची कहाणी,  नाग पंचामीची कहाणी , शुक्रवारची कहाणी.  लहान पाणी त्या कहाण्या मोठ्यांना वाचून दाखवताना भारी गम्मत वाटायची. शुक्रवारची वाट तर केवळ साखर फुटणे आणि दुधासाठीच बघायची. पण एक मात्र आहे, तेच साखर फुटणे तुम्ही श्रावण शुक्रवारी न खाता इतर दिवशी खाल्ले तर त्याची चव तशी वाटच नाही, ती  गम्मत इतर दिवशी नाही. जसे सत्य नारायणाचा प्रसादाच शिरा  इतर दिवशी अगदी तसाच केले तरी त्याची चव निराळीच वाटते.   मला नेहमी असे वाटते कि मराठी महिन्या मध्ये सगळ्यात धाम धुमिचा आणि आनंद साजरा करणारा महिना श्रावणच.  काही नअ काही कारणामुळे  घडणाऱ्या आप्तेष्टांचा  गाठी-भेटी आणि एकत्र केलेले स्नेह भोजन, एकत्र साजरे केलेले सण, एकत्र येवून केलेली पूजा, हेच  सगळे जास्त महत्वाचे आहे
कोणत्या चाली रिती बरोबर आणि कोणत्या चूक हा वादातीत मुद्दा आहे. पण कदाचित पूर्वीच्या काळी जेव्हा दळण वळणाची साधने कमी होती तेव्हा, या निम्मिताने घडणाऱ्या गाठी भेटीच महत्वाच्या असतील, मग मंगळा गौरी साठी, नाग पंचमी साठी घरी येणारी माहेरी येणारी  विवाहिता असेल किंवा रक्षा बंधनाला घडणारी भावा-बहिणीची भेट असेल,   सत्य नारायण पूजा , श्रावण  महिन्यात   मेहूण जेवायला बोलवायचे म्हणून बोलावणे  केलेले नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी असू देत, सगळ्या मागे एकच हेतू आहे कि त्या निम्मिताने एकत्र येवून आनंद वाटणे, साजरे करणे. त्या निम्मिताने काही दान-धर्म करणे. शेवटी संस्कृती जपणे म्हणजे तरी काय आहे, माणासुकी आणि नाती जपणे  हा सुधा संस्कृती जपण्याचा एक भाग आहे . आपल्या  धका धकीच्या आयुष्यामधून  थोडा वेळ काढायला काय हरकत आहे स्वतःच्या आणि इतरांच्या  आनंदासाठी .
करू यात या श्रावणाचे स्वागत आणि  आपल्या जीव भावच्या  सग्या-सोयारबरोबर थोडा आनंद  वाटू यात, थोडा उन - पावूस वाटू यात आणि इंद्रधनुचे थोडेसे रंग  पण

श्रावण आला वाजत गाजत
अन अनेक रंगाची उधळण घेवून
सृष्टी  ल्याते नव-वधूचा हिरवा शालू
अन जाते मन हे वेडे हरपून
श्रावण हा आनंदाचा, सप्तरंगी इंद्रधनुचा
श्रावण हा रिमझिमणारा अन श्रावण हा प्रसन्नतेचा
श्रावण हा नात्यांचा अन एकमेकातल्या  प्रेमाचा
- शीतल





Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience