पुस्तकांची दुनिया !!!!

पुस्तकांची दुनिया !!!!

तुझी माझी ओळख कधीची, मला आठवत नाही , कशी झाली ते हि मला आठवत नाही. पण तुझ्या शिवाय माझा एक हि दिवस सरत नाही. कारण इतक्या जिव्हाळ्याच्या आणि निरपेक्ष  मित्र नाहीच दुसरा कुणी
घरचे सांगतात कि म्हणे फार लहान होते मी. आणि तू पण म्हणूनच लहान आणि तू पण माझ्या सारखा रंग बेरंगी आणि अगदी सोपा. सुरवातीला चिऊ काऊ , भित्रा ससा, चतुर कोल्हा यांची सद्दी होती. मग, तुझ्या रूपाने खूप सारे मोठे हुशार कर्तुत्वान लोक भेटले मला. त्या लोकांचे विचार कळण्याचे वय नव्हतेच  माझे, पण मला तुझ्या मुळेच गोष्टी रूपाने सहज सोपे कळले ते मला. रामायण महाभारत , शिवाजी महाराज, झाशीची राणी, टिळक,  आगरकर , सावरकर असे किती तरी व्यक्ती मला ओळखीच्या बनल्या तुझ्या मुळेच . अर्थात माझे वय हि तसच होते , ह्या लोकांचे विचार पेलावण्याचे नसले तरी , किमान हे लोक महान आहेत हे तू मला पटवून दिलस. एका बाजूला तुझ्या मुळे मला केवळ मनोरंजन हि मिळत होते , चंपक , चांदोबा , ठक ठक वाचून .एकीकडे गोटया, चिंगी , फाफे सारखे थोडे व्रात्य पण मनानी निर्मळ आणि धाडसी मित्र पण आणि एकीकडे या महान लोकांशी माझी  ओळख पण होत होती

आता मागे वळून पाहताना मला असे वाटतंय कि या सगळ्यातून खूप सूक्ष्म संस्कार होत असतात आपल्यावर , कुणीही मुद्दाम उपदेश न करता आणि नकळत

आपली गट्टी तशी खूप जुनी आहे , तुला एक गम्मत सांगू का मला अजूनही कुणी सुट्टी कशी घालवणार, हे जर का विचारले तर गेली कित्येक वर्षे तू माझ्या सुट्टीच्या काळातला एक अविभाज्य भाग आहेस. नुकतीच मे महिन्याची सुट्टी  लागली आहे , हातात  मस्त पैकी एक गुंगवून टाकणारे पुस्तक आहे , हाशहुश करायला  लावणारा उष्मा आहे खरा , पंख्याचे वारे पण गरम येतेय , पण आपल्याला त्याची पर्वा नाही . आपण दोघेच " मी आणि माझे पुस्तक", आई एकीकडे विचारून वैतागालीये, जेवणार कधी , चहाची वेळ झालीये चहा कि सरबत आणि आपले लक्षच नाहीये . चौघीजणी, युगंधरा ,स्वामी किंवा असाच काही आपल्या हातात आहे , डोळ्यातून घळाघळा गंगा जमुना वाहत आहेत, पण आपण आपल्याच नादात रडतोय चक्क , आजूबाजूला कुणी आहे कि नाही ह्याची चिंता न करता .वाह याच्या पेक्षा छान ते आणखी काय .संध्याकाळी मस्त वाचनालयात जायचं , तिथे तुझी भावंडे अगदी गुण्या गोविंदानी नांदत असतात . अर्धा एक तास तरी त्या शेल्फ्सच्या रांगेत नवीन जुन्या पुस्तकांचा वास घेत , कधी हवे ते पुस्तक आहे का ते शोधण्यात , कधी प्रस्तावना आणि पुस्तकावर मागे छापलेल्या प्रतिक्रिया वाचण्यात कसा संपायचा ते कळायचे नाहीच 

खरे सांगू तुझ्या मुळे मला खूप लोक भेटले , पुस्तक लिहिणारे आणि त्यांनी ज्यांना लिहिले असे पण .
पुस्तक कधीच निर्जीव नसते , ती एक जिवंत कलाकृती आहे , तुम्हाला कडकडून भेटणारी . आनंदाच्या क्षणी एखादी छान कविता आठवतेच  कि , निसर्गाकडे पहायची दृष्टी बालकवी आणि बोरकर देवून जातात . कधी कठीण प्रसंगामध्ये एखादा पुस्तकातला विचार खूप धीर देवून जातो . पुस्तकातून भेटलेले एखादे काकाजी, आचार्य, एकटीनेच तत्व निष्ठा आयुष्य जगणारी बाबी , रोजच्याच प्रसंगाकडे वेगळ्याच दृष्टीतून पाहणारा पार्टनर , प्रेमाचा अर्थ समजावणारी एखादी युगा, निखळ आणि निरागस पणे लोकांना मदत करणारे  गोटया , चिंगी आणि बोक्या सुद्धा आपल्याला जगण्याची नवी उर्मी देत असतात
मला माणसाच्या या प्रतिभेचे खूपच कौतिक आणि अचंबा वाटत आला आहे . काल्पनिक म्हंटले तरी काल्पनिक असे नसतच ते . पुस्तक मधल्या व्यक्ती, प्रकृती घटना या सगळ्या कुठल्या न कुठल्या रुपात अंशत: का होईना पण समाज जीवनाचे प्रतिबिंब असतात. एखाद्या पुस्तकात आपणही सापडतो कि आपल्याला , अरे हे तर माझ्या सारखाच असे वाटते कि आपल्याला . 

माझ्या साठी घरातला आणि मनातला एक कप्पा पुस्तकासाठी खास आहे . आपल्याला वाचता येते याचा खरा आनंद मिळतो त्यातून . वेगवेगळी माणसे, त्यांचे स्वभाव आणि कोणत्या प्रसंगाला कोण कसा वागतो हे सांगतात बरे पुस्तके. कधी कधी वाटते हे एक प्रकारचे समुपदेशन म्हणजे आजच्या भाषेत "कौन्सेलिंग" च आहे .
पुस्तकांनी मला काय दिले हे मी शब्दात नाही सांगू शकत . आनंद मनोरंजन तर दिलेच पण मला वाटते जगण्याचे भानही दिले . भावना व्यक्त करायला शिकवल्या , माझ्या पालकांनी जे काही शिकवले त्याला पुस्तकांनी बळकटी दिली , खरच चूक झाली तर निर्भय पणे मान्य करायली हि शिकवले आणि समोरच्याला प्रसंगी माफ करायली हि . एखाद्या गोष्टीकडे चौकट मोडून पहायलाही शिकवले . अजून खूप वाचायचे , खूप पुस्तकांना भेटायचे बाकी आहे , आणि त्या मोहापायी तरी आपल्याला मस्त जगता आले पाहिजे हिच महत्वाकांक्षा आहे.

अथांग सागरातले काही शिंपले मिळाले म्हणून थोडी हरखली आहे मी पण हा सागर अथांग आहे , आणि वेळ प्रसंगी आपल्याला किनारा मिळवून देणारा आहे हे नक्की 


खूप वाचा आणि आनंदी राहा , आपल्या कक्षा रुंद करायला आणि मन मोठे करायला शिकवणारी या खेरीच कोणतीच शिकवणी नाही

घरातली एक जागा आपण ठेवतो न देवासाठी
तसाच एक कोपरा हि द्या कि पुस्तकासाठी
देवघर उजळून निघते न समईच्या प्रकाशनी
तसेच हा कोपरा पण उजळे कि ज्ञानाच्या तेजानी
जशी एक जागा तुम्ही राखून ठेवता मनातली
जवळच्या सुहृदांसाठी
तशी द्या एक "स्पेस"
या आयुष्यभराच्या मैत्रीसाठी
पुस्तक नाही मी फक्त एक निर्जीव
माझ्यातही नांदतात किती तरी जीव
जर जुळतील आपले रेशीमबंध
आयुष्यभराचे असतील हे ऋणानुबंध

— ©शीतल जोशी 

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी