#गुरुपौर्णिमा

#गुरूपौर्णिमा #gurupornima
जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणिजेती ।
परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥
~दासबोध

रामदासांना आपण समर्थ म्हणतो आणि का ते वरील दोन ओळीतच लक्षात येईल. कालातीत असे हे भाष्य आणी तितकंच परखड. कोणाला गुरू म्हणू नये हे इतक्या सोप्या भाषेत सांगितले आहे समर्थांनी. गुरू म्हणजे नक्की कोण, त्याची व्याख्या काय यावर अगदी एक शोध निंबध होऊ शकेल. पण वरील भाष्य हे अतिशय समर्पक आहे हे सांगायला चमत्कार, करामती दाखवून स्वतःला गुरू म्हणवून घेणारे तर नक्कीच सद्गुरू नाहीत.
कैक वर्षांपूर्वी केलेलं हे भाष्य आहे, दासबोधाची पारायणे केलेले लोक आहेत तरीही समाजामध्ये हे भोंदूबाबा थैमान घालताना दिसतात.
मी तरी माझ्या पुरती गुरू ची व्याख्या केली आहे.
जगण्याचे बळ देतानाच सद्सद्विवेक बुध्दी शाबूत ठेवतो तो गुरु. तो अध्यात्मिक गुरूच असावा असे काही नाही. नाही तर आई माझा गुरू अन सौख्याचा सागरू असे का बरे म्हणू आपण.
निराशा, अंधकार यावर मात करायचे बळ देतो तो गुरू. तुमचा मार्ग तो तुम्हालाच शोधायला लावतो पण मार्गक्रमण करायचा आत्मविश्वास देतो तो गुरू. गुरूचा आत्मानंद यातच असतो की शिष्याला त्याचा आत्मानंद सापडावा, इष्ट मार्ग मिळावा. शिष्याने गुरू दक्षिणा दिला का किंवा काय दिली ह्यापेक्षा तो काय शिकला ह्यावर ज्याचा आनंद अवलंबून असतो तो गुरू.
गुरू नेहमी मनुष्य रूपाने आयुष्यात यावा असे काही नाही. ज्यावर आपली श्रद्धा , विश्वास तो गुरू. उत्तम गुरू शिष्य ते असतात जे विश्वास अन अंध विश्वास आणि श्रद्धा अन अंधश्रद्धा या मधली पुसटशी रेषा ओळखतात. स्वतः स्वतःचे गुरू असणे आणि शिष्य असणे हा तर परमोच्च मोक्ष क्षणच. स्वत्व परीक्षा घेणें आणि देणें आणि त्यातूनच बोध घेऊन सुधारणा करत जगणे याहून अधिक जगण्याचे सार्थक काय आहे? पण हे वाटते तितके सोपही नाही. सतत स्वतःशी प्रामाणिक राहणे हे महाकठीण आणि म्हणूनच मग गुरू असावेत आयुष्यात. हेच तर गुरुबळ आहे, आता लोक ते पत्रिकेत शोधतात हा भाग निराळा.
सुख आणि दुःख ह्या दोन्हीतून मनुष्य जीवनाची सुटका नाही. सुख आणि दुःख भोगल्याशिवाय आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही. साधा सृष्टी नियम आहे की प्रसव वेदना सोसल्याशिवाय नवीन आयुष्य जन्माला येत नाही. मग हे चक्र कुणीच साक्षात परमेश्वर सुद्धा भेदू शकत नाही मग कोणता गुरू कसे हे तुम्हाला टाळून देऊ शकेल? गुरू तुम्हाला आत्मबळ मिळवण्याचा मार्ग शोधायला मदत करू शकतात, आणि म्हणून तेच गुरू खरे आहेत जे दुःख टाळता येणार नाही पण ते सोसण्याची शक्ती देतात.
साक्षात परमेश्वराला सुद्धा मनुष्य जीवनातली सुख दुःख, मातृ पितृ विरह, पत्नी विरह, जन्म मृत्यू ही बंधने सुटली नाहीत ; ती सर्व सामान्य जनांना कशी सुटतील.
खरा गुरू जीवनात लाभेल न लाभेल पण कमीत कमी अश्या चमत्कारी लोकांच्या नादी तरी समाजाने न लागावे हीच गुरू चरणी प्रार्थना
©शीतल

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी