व्यवहार

"व्यवहार" - भाग १
१० वर्षांनी , तो त्याच शहरात परत आला होता. त्याने जशी इतक्या वर्षात कात टाकली होती तशीच शहरांनी सुद्धा.तरी सुद्धा काही जुन्या खुणा शोधत त्याची नजर भिरभिरत होती. आणि अचानक स्थिरावली. काळ गेला तरी सगळंच बदलले पाहिजे असे नाही. त्याच्या चेहऱ्यावर हळूच एक स्मित पसरले.
ती त्या पुस्तकांच्या दुकानाच्या काउंटर च्या त्या बाजूला होती. दहा वर्षा पूर्वी त्यानं जसे सोडले होते सगळे काही तसच होते तिथे. ते दुकान, गर्दी, अगणित पुस्तके आणि ती सुद्धा.. .. अजिबातच बदलली नाहीये ती.
आता माझ्या इतकीच म्हणजे पस्तिशीत असेल ती, त्याच्या मनात सहजच हे विचार आले.
अजून हि पंचविशीत असेल अशीच दिसत होती ती. तोच बांधा, चेहऱ्यावर तेच करारी भाव, तिचे केस, तिचे कपडे , तिचे एकूण सगळे दिसणे सुद्धा तसेच अगदी पूर्वी होते तसे. हुश्श्य, बरे झाले कि ती अजून तशीच आहे. तो दोन पावले पुढे आला , थोडी धाकधूक थोडा उत्साह .
तरी.... . तो तिच्या कडे व्यवस्थित पाहत होता आणि काही खुणा दिसतात का बदलाच्या ते. शोधत होता. गळ्यात एखादी काळी पोत, नाही तरी सोनाच्या चेन मध्ये कुठे तरी दोन काळे मणी, कपाळावर ठसठशीत कुंकू किंवा हातात एखादी का असेना बांगडी. यातले काहीच दिसत तरी नव्हते. पण आजकाल कुठे हे सगळे घातले जाते म्हणा आणि तसे पण तिला या सगळ्याची विशेष आवड पण नव्हती. तिला आवड होती पुस्तके आणि माणसे वाचत जाण्याची . व्यवहाराची बाजू तशी कमीच. कदाचित म्हणूनच आपण "बायको मटेरियल नाही बाबा " , या मित्रांच्या आणि घराच्यांचा सल्ल्याला सहज बळी पडलो.
तिने पहिली असेल का आपली वाट दहा वर्षे ? अजून हि दुकान तीच संभाळते, म्हणजे कदाचित ती अजूनही ....एकटीच . पण बाबा दिसत नाहीयेत , म्हणजे काही बरे वाईट तर ?
त्याच्या मनात असंख्य विचार गर्दी करत होते आणि तो पुढे आलेली दोन पावले मागे गेला
अर्धा एक तास गेल्यावर, त्याने परत धाडस गोळा केले आणि ठरवलंच कि जायचे दुकानात. जे काही असेल ते असेल , होईल ते होईल , पण माघार नक्कीच नाही. तेवढ्यात त्याला बाबा दिसले. ह्यांचे हि वय वाढले नाही कि काय ? कि खरंच काळ थांबलाय आपल्या साठीच गेली १० वर्षे , त्याला उगाचच असे वाटले. अजूनही मनात धाकधूक होतीच; पण वेडी आशा पण होती . संसाराचे चटके त्याला , संसार न करताच बसले होते. घरच्यांची मदत घेऊन घेतलेला बुद्धिवादी निर्णय खर तर चांगलच फसला होता. होरपळून निघाल्यावर , त्याला आता परत मायेची फुंकर हवी होती. आणि अशी एकच व्यक्ती त्याच्या आयुष्यात होती , ती म्हणजे ... तो परत फिरला होता १० वर्षे मागे. आता घरचे काहीही म्हणू देत , त्याला काही फरक पडणार नव्हता
तो दुकानाबाहेर उभा होता , तेवढयात तीच आली
" अक्षय तू ? अरे असा अचानक ? ये ना आत ये "
त्याच्यात बरा च फरक पडला असला तरी तिने त्याला क्षणातच ओळखले होते. त्याला वाटले, सुरवात तर बरी झाली.शेवटी खरे प्रेम हे कालातीत असतंच नाही का !
तिने त्याला बसायला खुर्ची दिली, आणि हाक मारली ,
"ऋतुजा , पाणी आण ग जरा. आणि रामजी काकाला २-३ कप चहा पण आणायला सांग समोरून "
ती फारच नॉर्मल वाटत होती. त्याला काही अंदाजच येत नव्हता. तेवढ्यात आतून एक ७-८ वर्षाची मुलगी पाणी घेऊन आली. तिच्या सारखी दिसतिये का ? डोळे थोडे वाटतायत तिच्या सारखे , पण असे लगेच काही विचाराणे बरे नाही दिसणार, त्याच्या येऊन गेले. 


"व्यवहार" - भाग 2
ऋतुजा , चुणचुणीत तर होतीच, धीट पण वाटली. डोळ्यात पण एक खास चमक. बहुधा ... आपली काय म्हणून ओळख करून देईल ती , ऋतुजाला ? पण ती वेळच आलॊ नाही. 
रामजी काकाला निरोप सांगायला ऋतुजा जी गेली , ती रामजी काका सोबत बाहेर जातानाच दिसली. 
"कशी आहेस ? बाबा कसे आहेत?"- काहीसे धाडस गोळा करून त्याने सुरवात केली. 
"मी छान रे. दुकान पण मस्त सुरु आहे आणि नव्या बऱ्याच गोष्टी मी सुरु केल्या आहेत आता इथे. बाबा थोडे थकले आहेत ; पण उत्साह टिकून आहे बर. मीच त्यांना आता घरी पाठवले, नाही तर विश्रांतीच होत नाही त्यांची. "ती असे काही सहजतेने बोलत होती, कि जणू मध्ये इतकी वर्षे गेलीच नाहीयेत. अजिबात अवघडलेपण नाही, पण बोलणे मोघमच. 
खूप वर्षांनी भेटल्यावर, जे काही नाट्यमय घडते; ते बहुधा सिनेमातच, या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले, या प्रसंगात मध्ये सुद्धा. 
"तू इकडे कसा काय आलास आज ? काही विशेष काम?"
तुला भेटायला , असे म्हणायचे होते, पण शब्द वेगळेच आले त्याचं ओठातून 
"जरा काम होते इकडे; कदाचित इथेच राहीन मी काही काळ"
"इथे ? तू इथे काय करशील ? कितीहि सुधारणा झाली असली तरी , हे शहर तसे छोटे आहे. तुला इथे तास वाव मिळणार नाही "
"अग, छोटे आहे म्हणूनच. इथेच खूप काही करायला वाव आहे, असे माझ्या पार्टनर ला वाटतंय"
"म्हणजे, तू आता नोकरी नाही करत ? स्वतःचे काही सुरु केले आहेस का ? मस्तच !!"
"हो , म्हणजे आताच सुरु केले आहे. बघू यात कसे काय जमतंय ते. " - तो चक्क खोटे बोलत होता 
" तुला नक्की जमेल रे. हुशार आहेसंच तू , आणि जिद्द पण आहे तुझ्यात "
त्याला जरा बरे वाटले. ती आपल्या बद्दल चांगलेच बोलतीये; म्हणजे कदाचित ?
"अक्षय, तुझ्या कामाचे नक्की स्वरूप मला नाही माहित. पण मी करेन जी काही मदत लागेल ती. बोलूच आपण निवांत. मी आलेच जरा, १५-२० मिनिटात. बस तू"
इतक्यात , चहा आला आणि ऋतुजा सुद्धा. तिने त्याला चहा दिला आणि म्हणाली 
"माईनी सांगितल आहे, तुम्हाला चहा घ्यायला. नाही तर थंड होईल ना. "
"असू दे ग, ती आल्यावरच घेऊ आम्ही"
"नको, तुम्ही घ्या. माई म्हणाली 'तुम्हाला चहा गरमच लागतो'"
ऋतुजा नि अगदी हुबेहूब तिची नक्कल केली. दोघे पण हसायला लागले. 
५ मिनीटांनी , ऋतुजनी त्याचा निरोप घेतला, शाळेत जायचे आहे म्हणाली आणि रामजी काका सोबत गेली सुद्धा. 
ऋतुजा तिला "माई" म्हणते , म्हणजे त्या दोघींचे नक्की नाते काय ? तसे तर, माझे आणि तीचे तरी आता काय नाते आहे म्हणा !!!
त्याला तिथून निघून जावे असे वाटत होते. विचित्र परिस्थिती होती ही. मुळातच त्याचा स्वभाव उतावळा, एक घाव अन दोन तुकडे असा. हे असे कण-कण झिजणे आणि क्षण - क्षण वाट पाहणे असह्य होते. 
ती परत आली. 
"अक्षय, अरे तू कुठे उतरला आहेस? आपण संध्याकाळी भेटू यात का , चालेल का ? म्हणजे काय झालय कि इथुन २० किलोमीटर वर एक गाव आहे , तिथे माझे काम आहे आज जरा. आणि तू अचानक आलास ना , आता मला कॅन्सल पण नाही करता येणार "
"काही हरकत नाही. आपण भेटू संध्याकाळी. कुठे भेटू यात ?"
" मी कळवते तुला. खर तर घरीच आलास तरी चालेल. बाबा पण भेटतील. जेवायलाच ये."
"घरी नको. म्हणजे बाबाना भेटेन मी उद्या. आज आपण बाहेरच भेटू."
"बर. ए, मग सरळ 'अन्नपूर्णा"ला भेटू ना. तुला आवडायचे ना. अजूनही तसेच आहे अरे. "
भेटायचे नक्की करून, ती बाहेर पडली. अक्षय सुद्धा , बाहेर पडला. 
हिला, सगळे कसे अजूनही लक्षात आहे. मला पण आठवतय का अजून , तिला काय आवडते ते ? संध्याकाळी एखादी भेट नेली , तर ती घेईल का ? तिला आवडेल का ? तिच्या सगळ्या बोलण्या वरून तर असच वाटतंय कि ती नक्की परत येईल, माझ्या आयुष्यात. तिला अजूनही माझ्या बद्दल आपलेपणा वाटतोय. ती single असेल अजूनही.
पण मग ऋतुजा, तिचे काय ?

व्यवहार -भाग 3
ती ठरल्या वेळी पोचली. तो तर आधी पासूनच तिची वाट पाहत होता.
"छान दिसतियेस "
"गम्मत पुरे हं . "- ती दिल खुलास हसली तशीच.
"आता सांग बघू निवांत , तुझ्या कामा बद्दल . सकाळी गडबडीत काही बोलताच आले नाही"
त्याचे मन सतत १० वर्षे मागे फिरत होते आणि ती मात्र त्याला वर्तमानात आणत होती. सकाळी आणि आता सुद्धा तिने काम बद्दलच विचारले, बाकी काहीच नाही. म्हणजे कुटुंब , आई - बाबा , संसार , बायको , मुले .. काहीच विचारायचे नाहीये तिला. मी तिच्या बाबाबद्दल विचारले ; तरी पण तिने मला उलट काहीच नाही विचारले.
आणि आता कामाबदल काय सांगणार कप्पाळ ? मलाच काही माहित नाहीये.
"कामाचे सांगतो ग नंतर. ते काय आहेच कि. पण एक आहे हा , तू मात्र आहे तशीच आहेस "
ती फक्त हसली आणि म्हणाली
"असेंनही कदाचित तशीच किंवा बदलली असले तरी तुला थोडीच कळणार आहे? कित्येक वर्षे गेली आहेत मध्ये. "
"फक्त १० वर्षे "- तो म्हणाला
"हम्म" ती एवढच म्हणाली
ते दोघे जेवून बाहेर पडले.
"मी निघते आता "
" थांब कि थोडा वेळ . चालत एक राऊंड मारू पूर्वी सारखा "
"बर. पण एक मिनिट, मी जरा घरी कळवते; नाही तर ऋतुजा उगाच वाट बघत जागी राहील"
परत तेच होत होते, त भूतकाळ सोडत नव्हता अन ती वर्तमान घट्ट पकडून ठेवत होती.
"ऋतुजा , गोड मुलगी आहे. अगदी तुझ्यावर गेलीये"
"अरेरे, म्हणजे तिचे काही खरे नाही "- ती मन मोकळे हसली.
"तू आज कुठे गेली होतीस?"- त्याने चाचपणी सुरु केली. सरळ सरळ विचारण्यापेक्षा , असच गप्पामध्ये अंदाज घ्यावा.
"अरे, मी कुसगाव ला जाऊन आले. ऋतुजाचा काका तिथे डॉक्टर आहे. त्याला इथून काही वस्तू हव्या होत्या. तिथे नाही ना मिळत"
त्याला ऋतुजाचे काका कोण आहेत या पेक्षा ऋतुजा आणि हिचे नाते काय आहे ते हवे होते.
"मग ऋतुजा आणि तू वरचेवर जात असाल ना तिथे ? "
"जातो अधून मधून. तिला आवडते तिकडे गावाकडे पण. अन काकाची ओढा पण आहे तिला. मस्तच माणूस आहे रे. इतके शिकून सुद्धा , त्याला गावातच काम करायचे आहे. त्याच्या मुळे आजू बाजूच्या पण ४-५ गावांचे भले झाले आहे."
"माझी पण तीच कल्पना आहे कि इथे विकास व्हायला हवा; म्हणूनच तर आम्ही सुद्धा इथेच सगळे प्लॅन करतोय"
" चांगली कल्पना आहे. तुला नक्की यश मिळेल. चल मी निघते आता. उशीर झाला आहे. तू कुठे उतरला आहेस? तुला सोडू का ? "
"चालेल"
तिनी गाडी सुरु केली, आणि रिव्हर्स टाकला. सफाईने गाडी पार्किंग मधून बाहेर काढली. खरच बदल झालाय की , असे त्याला वाटले. चारचाकी चालवायला कंटाळा करणारी, रिव्हर्स टाकताना टेन्शन घेणारी "ती" त्याला आता दिसत नव्हती.
तिने रेडिओ ऑन केला. गाणे लागले होते
'जाइये , आप काही जायेंगे , ये नजर लौट के फिर आयेगी'

व्यवहार भाग -४
गाडीतून उतरताना तिने त्याला विचारले
"किती दिवस आहेस अजून इथे ?"
"उद्या रात्री किंवा परवा जाईन म्हणतोय "
"बर. काही लागले तर सांग"
"उद्या भेटायचं का ? म्हणजे खूप वर्षांनी भेटलोय ना. आणि मला पण कंटाळा नाही येणार तू असलीस कि सोबत "
"बर . उद्या फोन कर भेटू मग. गुड नाईट "
"गुड नाईट"
तो हॉटेलच्या रूम वर आला. आजची रात्र अन कदाचित ...
किती तरी वेळ त्याला झोप येत नव्हती. जुने अनेक प्रसंग डोळ्यासमोर परत उभे राहीले. इतके भिन्न स्वभाव; पण तरीही एक घट्ट नाते होते तिच्या सोबत. काही काही ऋणानुबंध उमजणयाच्या पालिकडचे असतात
दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा फ़ोन आला . तिला बाहेरगावी जायचे होते.
"मी पण येवू का ग? तसे आज मला काम नाहीये."
"चल की मग. मी येते तिकडे तासाभरात. निघू मग"
त्याला आनंद झाला, तिने कसले ही आढे वेढे घेतले नाहीत.
गाडीमधे बसल्यावर काही जुजबी गप्पा झाल्या. पण मग शांतता. ही कोंडी कशी फोडायची? तरी त्याने सुरवात केली
"चांगली चालवातेस की आता. आठवते ना, कॉलेज मधे असतानाच ?"
"हो , आठवते की. डेंजर ड्राइवर नाव ठेवले होते माझे तेव्हा. पण काळ जातो तसे माणूस सुधारतो की. सवय झलिये आता मला. काही काही गोष्टीची इतकी सवय असते की, असे वाटते की आयुष्यभर त्या टिकतील नाही?"
"हो. ऋतुजा नाही आली का तुझ्या सोबत?"
"अरे शाळा आहे तिला. आणि तसे ही तिला शाळा आवडते"
एका ठिकाणी तिने गाडी कड़ेला घेतली.
"इथे चहा फक्कड़ मिळतो. चहा घेवू अन मग जावू पुढे"
" किती वर्षे गेली ना मधे. " ती सहज म्हणाली
"हो. आणि तसा संपर्क ही राहिला नाही"
"ठीक आहे रे. आम्ही बाकी सगळे संपर्क ठेवून आहोत. तुझा पण विषय निघायचा मधे मधे"
"म्हणजे तुला सगळे माहित आहे"
"सगळे असे नाही, पण बरचसे"
"पण मला मात्र तुझ्या बद्दल काहीच माहित नाही"
" जावू दे रे . कशाला किल्मीष बाळगयाचे आता.खर सांगु, तू गेलास तेव्हा सुरावतीच्या काळात खुप अस्वस्थ होते मी"
"मग?"
" सुरुवातीला प्रचंड राग होता मनात. 10 -12 दिवसांनी, बाबा बोलले माझ्याशी आणि मग मला तुझा राग नाही आला कधीच. आपल्या नात्यांमधे हा दुरावा येवू शकतो; हे काही अपरिचित नव्हते मला. पण मी वाजवी पेक्षा जास्त विश्वास ठेवला स्वतवर
मला वाटले, मी निभावेन. विश्वास कसला अहम की आपली जागा कुणी घेवू शकत नाही याच्या आयुष्यात.चार साध्या गोष्टीत तुला आधार दिला तर मला वाटले की हेच ते त्रिकालबाधित प्रेम.मी हे सगळे तिरकस पणे अजिबात बोलत नाहीये. निर्णय जरी तू घेतला होतास; तरि त्याची जबाबदारी माझ्यावर पण तितकीच होती. तुझ्या साठी पण हे इतके सोपे नाही याची जाणीव झाली. त्या वेळी जे क्षण आपण जगलो ते खरे होते, पण तितकेच क्षण आपले होते, जे आयुष्याने आपल्याला दान केले. तू आल्यापासुन बेचैन आहेस म्हणून आज बोलले. माझ्या मनावरचे ओझे मी केव्हाच उतरवले, ज्या क्षणी आपल्या दोघना
माफ केले. तू का ते ओझे मनावर ठेवले आहेस.राग, लोभ, कटुता , प्रेम सगळे पाहिले आपल्या नात्यानी, आता बाकी काही ठेवू नको. विसरता नाही येत काही गोष्टी आयुष्यात, पण त्या हातात घट्ट ठेवू नकोस, वाहत्या कर. "
असे म्हणून तिने हलकेच पाठीवर थोपटले. त्याला तो स्पर्श आधार वाटले. जे काही ती बोलली , ते मनापासून होते, याची साक्षच होता तो स्पर्श.
"चल निघू यात. तू विचारले नाहीस पण मीच सांगते आपण कुसगावला जातोय"
त्याच्या मनात पटकन विचार आला
"म्हणजे ऋतुच्या गावी कि हिच्या सासरी?"
गाडिने अजुन एक वळण घेतले.

व्यवहार :भाग 5
गाडीत पुन्हा एक शांतता जीवघेणी त्याच्या साठी.
विचारु का हिला, सरळ सरळ की तुझे लग्न झालाय का? सगळे बोलतीये पण जे हवय तेच सांगत नाहीये
त्याने ही कोंडी फोडलीच
"तू खरच मला माफ केले आहेस? तुला कधीच माझा राग, द्वेष नाही वाटत?"
"आता नाही वाटत अरे."
"म्हणजे पूर्वी ?"
"द्वेष नाही पण कटुता तर होतीच. स्वाभाविक नाही का ते.काही वर्षापूर्वी जर तू आला असतास तर कदाचित"
"तर काय ?"
"मी तुला टाळले असते. सुरुवातीला मला खुप अगतिक झाल्यासारखे वाटले. स्वतःचा पण राग यायचा. प्रेम माणसाला सहनशील बनवते की इतके अगतिक आणि हतबल? का आपण आपले अस्तित्वाची सांगड तुझ्या अस्तित्वासोबत घालतो आहे? नाते संपले म्हणून दुःख आहे की तू ते नाते नाकरले म्हणून माझ्या स्वाभिमान, अभिमान डिवचला गेले आहे. प्रेम किती ही गाढ़ असले तरि अहम असतोच की. अहम ला ठेच लागली त्याचा त्रास कदाचित नाते संपले या पेक्षा जास्त होता. एकदा नक्की हे कळले आणि मग पुढची वाटचाल सोपी झाली. आपण प्रेमात म्हणतो रे,एकमेकाशिवाय जगु शकत नाही. पण तो पर्यन्त जगणे कशाला म्हणतात हे कुठे माहित असते. एकमेकासोबत जगणे कदाचित आयुष्य थोड़े सोपे करत असेल; पण जगणे हा धर्म आहे, ते वास्तव आहे आणि त्याला नकार देण्याची हिम्मत तुझ्या माझ्यात नाही, आणि ते करू पण नये."
त्याला काय बोलावे तेच कळत नव्हते. अजूनही तिच्या कड़े सांगण्यासारखे खुप काही आहे.
"मला कळते ग, तुला काय वाटले असेल. मी फार मोठी चूक केली. ती सुधारायची एक संधी मी शोधतोय"
"निर्णय चुकला आणि चूक केली या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. निर्णय विचार करून घेतो आपण, हा आता त्यातले काही आडखे चुकु शकतात. चूक मात्र कधी कधी अजाणतेपणी होवू शकते. तू ठरव एकदाच नक्की काय ते. आणि माफ तर मी तुला कधीच केले आहे. मागेच टाकावे जे काही घडले ते, नाही तर भविष्यकाळ कसा दिसेल.
गाडी थाम्बली, एका चौसोपी वाडयासमोर.
दोघे पण उतरले
"कमला ताई , मी आले ग"
कमला ताई बाहेर आल्या
"ये ग ये . अचानक आलिस ती?"
"म्हणजे डॉक्टर साहेब विसरले ना निरोप"
" नेहमीचच आहे ते आता. अग पाहुणे दारात का? त्याना आत घेवून ये"
"ताई, हा माझा मित्र, खुप वर्षे ओळख आहे आमची. आला होता भेटायला मग मीच म्हणाले चल माझ्या सोबत"
"अग बरच केलस. तुला सोबत पण झाली अनायासे. तुम्ही आराम करा , मी चहा टांकते. आणि खायला पण करते मस्त काही तरी"
"मस्त आहे ना रे वाडा"
"हो ग, प्रशस्त आहे. कुणाचा आहे हा"
" अरे डॉक्टर आणि ताईचा. तसे दुरचे नाते आहे त्यांचे पण तसे वाटत सुद्धा नाही. ताई , त्यांचा नवरा आणि डॉक्टर सगळे एकत्र राहतात इथे.मी आणि ऋतु येत असतो इथे अधुन मधून.ऋतु च बालपण इथेच गेल ना बरचसे"
तेवढ्यात ताई चहा आणि खायला घेवून आल्या.
बोलणे तिथेच अर्धवट राहिले. खर तर मनातल्या शंका दूर करायची छान संधी होती. खाणे झाल्यावर ती उठली.
"मी, शाळेत जावून येते तासा भरात. तू आराम कर"
तो हो म्हणाला . एका अर्थाने बरच होते. कदाचित ताई कडून काही तरि सुगावा लागेल.
ताई सोबत हळू हळू गप्पा सुरु केल्या.
"अरे काय सांगु तुला, माझी कहाणी.१0 वर्षाची होते तेव्हा पासून जी या इथे आले, ती इथेच आहे अजुन ही. किती बरे वाईट प्रसंग पहिले. पण काय करणार.आता या डॉक्टर ची आणि तुझ्या या मैत्रीणीची एकदा शिस्त लावली की मी मोकळी. तशी ऋतुजा ची काळजी नाही आता मला.आई वडीलांची पाखर या दोघांच्या रूपाने आहे तिला."
त्याला नक्की कळत नव्हते की ताई काय बोलतात ते. इतके तर नक्की की ऋतु तिची मुलगी नाही. मानलेली मुलगी असु शकेल.
"तुमच्या घरी कोण कोण असते? लग्न वगैरे झालाय की नाही"
या प्रश्नामुळे तो भानावर आला...
"आई बाबा आहेत घरी. "
"म्हणजे तुम्ही पण अजुन एकला चलो रे का.कुणी आवडली आहे की लग्न करायचे की नाही हेच ठरले नाहीये. रागवु नकोस हा, सहज विचारले. तुझ्या वयाची खुप मुले मुली माझे मित्र आहेत. प्रेमबिमात पडतात रे पण कमिटमेन्ट ला पळून जातात. असो. तुला घोट भर चहा आणू का. आणि त्या मागच्या कपाटा मधे खुप पुस्तके आहेत, बघ हवे असेल तर एखादे"
त्याने कपाट उघडले, नेमके पार्टनर समोर आले व पु काळे यांचे, आणि त्याला आठवले त्यातले एक वाक्य
'आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक!'
त्याच्या मनात आले, आपल्या आयुष्यात कोण हा तिसरा माणूस
डॉक्टर की ऋतु ... की ती आणि ऋतु किंवा ती आणि डॉक्टर मधला तिसरा माणूस मीच आहे 

व्यवहार -भाग 6 (अंतिम भाग)
चहा घेऊन ताई बाहेर आल्या. त्याने धाडस केलेच आणि ठरवले कि ताई ना विचारू ऋतू बद्दल 
"ताई, ऋतू एकदम गोड मुलगी आहे. "
"हो रे. ती एवढेसे बाळ होती ना तेव्हा मलाच तिची आई व्हावे लागले बघ"
"म्हणजे ?"
"तुला काहीच माहित नाही का ?"
"नाही हो. मी खूप वर्षानि आलो आहे ना. मधे  काही वर्षे काही संपर्क नव्हता आणि असे एकदम कसे विचारणार ऋतू बद्दल "
"खरंय.  तुला कसे कळावे बर हे सगळे. ऋतू लहान होती तेव्हाच  तिचे आई वडील देवाघरी गेले, मागे राहिला फक्त डॉक्टर, काका म्हणून आणि मी ताई, आई ,आजी सगळे काही..." ताई एकदम गप्प झाल्या. त्याने मागे वळून पहिले तर   ती  परत आली होती. 
हातची संधी दवडली गेली. 
" झाले का ग काम तुझे"
"हो झाले ताई . आम्ही जेवण करतो आणि लगेच निघतो. तसे पण डॉक्टर साहेब  आज उशिरा येणार तर त्यांची भेट काय होणारच नाही.  जेवण करून निघालो तर  रात्री वेळेत पोचता येईल "
'चालेल . मी  जेवणाचे  बघते लगेच. तुम्ही बसा गप्पा मारत. नाही तर चक्कर मारून या आपल्या शेतापर्यंत. तसे काही ऊन पण नाहीये."
"नको. दमायला झालाय जरा , इथेच  थांबतो. काही मदत करू का ? 'तिनि विचारले
" नको अग. तू आराम कर, परत गाडी  चालवत जायचा ना . बर  बाबा आणि ऋतू कधी येणारेत.  बरेच दिवस झाले. या ना तुम्ही सगळे ४ दिवस सुट्टी घेऊन "
" यायचे आहे ग. मला पण जरा कंटाळा आलाच आहे  रुटीन चा. "
"म्हणूनच म्हणते कि बाई,  एकटी किती दिवस जबाबदारी घेशील.  इकडेच येऊन रहा ना."
"  ताई , आपलं ठरलय ना  कि आता यावर नाही बोलायचे आहे. "
"बर बाई. पण माझा मन ऐकतच नाही बघ. जीव तुम्हा पोरांसाठी तुटतो माझा. तुमची एकदा शिस्त लागली कि आम्ही निश्चित होऊ ग "
"ताई , शिस्त शिस्त म्हणजे की काय ग? एका ठराविक चौकटीतच शिस्त बसवायची आयुष्याची आणि असे  करून तरी  गॅरंटी असते  का कशाची? उद्याचे काय माहित आपल्याला. आज मध्ये जगावे"
" तू काय बोलण्यात ऐकणार आहेस मला."  
त्याच्या कानावर सगळे संभाषण पडत होते आणि अर्थ पण लागत होता. आता फक्त तीच कुणाच्या प्रेमात नाही ना इतकाच जाणून  घेणे बाकी होते.  तसे काही  नसेल तर  मग मनासारखे होईलच. 
ऋतू तिची मुलगी नाही आणि ऋतूला कमीत कमी तिचे कुटुंब आहे. बाबांची जबाबदारी काय घेता येईल. तिच्या मनात जर दुसरे कुणी नसेल तर मग ती  नक्कीच हो  म्हणेल, शेवटी पहिले प्रेम जर आयुष्य भर मिळाले तर कुणाला नको आहे. 

मन किती विचित्र असते ना, काही क्षणात पूर्ण आयुष्याचे प्लानिंग करून टाकते.
त्याने ठरवले की आज परत जाताना सरळ विचारुन टाकयाचे. 
बघता बघता निघायची वेळ झाली. त्याला काय वाटले कुणास ठावुक, पण तो ताईला नमस्कार करायला वाकला,
"सुखी हो. तुझी मनोकामना पूर्ण होवो"
आशीर्वाद घेवून बाहेर पडला.
"मी चालवू का ग? दमली असशील ना तू?"
"नको, सवय आहे मला आणि रस्ता पण महितीचा आहे"
"आपण एकत्र जेवु यात का आज रात्री? थोड़े बोलता पण येईल" त्याने विचारले
" ठिक आहे"
ती सफाईनी गाड़ी चालवत होती, शांत वाटत होती. हिच्या मनाचा थांग लागतच नाही. तशी सरळ स्वभावाची, स्पष्ट पण...
"पोचलो आपण, उतर"
त्याची तन्द्री भंगली.
ज्याची वाट पहिली तो क्षण आला. 
त्याने एक जरा बाजुची शांत  जागा निवडली हॉटेल मधे. ऑर्डर सुद्धा पटापट दिली, नंतर व्यत्यय नको.
" कशी सुरवात करू कळत नाही ग.किती वर्षाच मनात साठले आहे. तू नेहमीच माझ्या मनात होतीस, तुला कसे विसरेन मी. पण धाडस झाले नाही, परत यायचे. आज झाले"
"बर झाले की मग. मन मोकळे झाले की ओझे कमी होते रे. "
"म्हणूनच आज सरळ विचारतोय, प्रेम करशील माझ्यावर ? "
ती हसली, 
"करशील म्हणून काय विचारतोस. मी तुला माफ केले ते प्रेम होते म्हणूनच ना. तू आनंदी असावे असच वाटते मला. मी सांगितले की माझ्या मनात आता कसले क़िलमिष नाही आहे."
"मग, झाले तर. मी उद्या लगेच परत जातो. घरी पण बोलतो. तसाहि ऋतु हे वर्ष संपले की मग आपण विचार करू पुढचा; म्हणजे मग शिक्षणात व्यत्यय नको.मग ऋतु राहील की तिच्या काका सोबत. तो पर्यंत तुला पण दुकानाची व्यवस्था लावता येईल.बाबा बद्दल मी घरी बोलणार आहेच. आता सगळे ठीक करतो बघ. मागच्या सगळ्या वर्षात तू जे काही सोसले आहेस, ते सगळे विसरायचे आता. आता फक्त तू आणि मी आणि आयुष्यात आनंद असेल " तो एका श्वासात बोलून गेला.  तिचे भरून आलेले डोळे त्याला दिसलेच नाहीत
"एक मिनिट. जरा ऐक ना मी काय म्हणते ते. अरे ऋतुजा..."
"मला महितिये ग आता, की ती तुझी मुलगी नाहीये. आणि तिला तिच्या कुटुंबाचा आधार पण आहे. आणि आपल्या पेक्षा कैक श्रीमंत आहेत ती लोक. आणि तुझ्या सवयी बद्दल म्हणशील तर, आपण शनिवार रविवार भेटू की तिला. मी प्रोमिस करतो, मी स्वतः घेवून येईन तुला."
"ऐक जरा, ऋतु चा फोन येतोय.मला जरा बोलू दे तिच्या सोबत. ...हा ऋतु ऐक बेटा, मी पोचली आहे;पण थोडा उशीर होईल. तू झोप बर आता, सकाळी बोलू हा आपण"
तिने फोन ठेवला आणि ती वळली
"चल निघू यात. मी तुला तुझ्या हॉटेल वर सोडते."
हॉटेल येई पर्यन्त ती काहीच बोलली नाही. त्याला वाटले इतके अचानक सगळे घडले त्यामुळे ती इतकी शांत बसली असेल.
हॉटेल आले. त्याच्या पाठोपाठ ती पण उतरली.
"थांब, मला बोलयच तुझ्याशी. तू आलास, भेटलास,मला बरे वाटले. पहिले प्रेम आहेस ना तू माझे. किती ही दुखवले असले तरि तो एक नाजुक धागा असतोच ना.मनात एक कोपरा आहेच त्या साऱ्या भावना जपणारा. कधी तरी खुप दाटून यायच सारे, अश्रुन्मधे सारे वाहून जावे असे वाटायचे. पण आता नाही वाटत असे. ऋतु, ताई, बाबा, रामजी, डॉक्टर ही माणसे आजुबाजूला असली की, आता नाही वाईट वाटत जे घडले त्या बद्दल. खास करून ऋतु सोबत असताना. मी काय तिला आधार देईन, त्याच चिमुकल्या जीवानी मला जगयाच बळ दिले आहे."
"अग पण, मी आलो आहे ना आता. आणि ऋतु ला तोडून कुठे टाकयाच आहे? तिला भेटू की आपण अधुन मधून.तिचे सगळे लाड़ हट्ट पुरवू आपण"
"एक मिनट, माझे पूर्ण बोलून नाही झालाय अजुन. मी जे बोलेन ते कटु वाटेल तुला; पण नाइलाज आहे. मला सोडुन तू गेलास आणि आता परत आलास कारण तुझे ठरलेले सहजीवन यशस्वी झाले नाही म्हणून. तुझे प्रेम नव्हते किंवा नाही असे म्हणून तुझ्या भावनेचे अवमूल्यन नाही करायाचे मला. पण आता तुला जो आधार हवा आहे त्या साठी मी एक उत्तम, सहजसोप्पा पर्याय आहे. या वेळी तुझ्या घरच्याना तयार करणे ही सोपे आहे; कारण ...असो... पण मी सगळेच मागे टाकले आहे आता"
"अग पण , एक नवी सुरवात कर ना. मी चुकलो, तू माफ पण केलस. नशीब म्हणून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायला मिळते आहे. तू म्हणशील तसे करू आपण. सगळे आयुष्य आहे तुझ्यासमोर. ऋतु काय मोठी होईल. तिला ताई  सगळे आहेत तिचे नातेवाईक. तुझे काय? जरा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर.माझ्या सोबत तुला एक स्थिरता मिळेल, प्रेम मिळेल आणि काय हवे आहे ग"
"तुला नाही कळणार माझे म्हणणे रे. कारण आज ही ते व्यवहारी नाहीये. आणि तुझे सगळेच आखिव रेखीव, लौकिक अर्थाने योग्य आणि व्यवहारी. व्यवहार हवाच रे,  तो असावा आयुष्यात;पण मला नाही जमत इतकेच. प्रेमाचा हिशोब नाही ठेवता येत मला. म्हणून तर तुझ्यावर प्रेम केले, तुझी सोबत मिळणे कठीण आहे हे माहित असताना. आणि म्हणूनच तुला माफ केले ते पण प्रेमा खातरच. जे क्षण तुझ्या सोबत जगले ते खरे होते; म्हणूनच त्याना साक्षी ठेवून, तुझ्या सोबत हे 4 दिवस पण तुझ्या मनाप्रमाणे काढले मी. तुला हलके वाटावे म्हणुन. आता माझे म्हणणे ऐक.
मला माझे कुटुंब आहे, कायम साथ देणारे. बाबा तर होतेच. पण मी, ऋतु आणि डॉक्टर आम्ही तिघे पण एक कुटुंब आहोत. बाबा, ताई अशी लोक ही आहेत सोबत. तुला महितिये, ऋतु मला माई म्हणते. मीच सांगितले तिला तसे, आई-मावशी-काकू-आत्या असे काहीच नको. आम्हा तिघानी एकमेकांना कोणत्याच नात्यांच्या अपेक्षा सहित वागवु नये म्हणून. तिला दत्तक घ्यावे असे वाटेले पण मग कायदेशीर नाते, त्याला एक नाव, हाच व्यवहार नको वाटला. माझे आणि डॉक्टर चे मस्त जमते, मैत्रीच्या पलीकडे पण एक नाते आहे आमचे कदाचित प्रेमाचे. पण नवरा बायको हे नाते परत तेच व्यवहार. नकोच ते सगळे.ऋतुजा चे काका काकू किंवा आई बाबा व्हायचे आणि न पेलणारी नाती, अपेक्षा  ठेवायच्या.आणी या साऱ्यात त्या छोट्या जिवाची फरफट करायची.
मग निर्व्याज प्रेम कसे राहील, जे आता आहे आमच्यात. सुरुवातीला बाबा आणि ताई ना हे सारे नाही पटले, पण पटतय आता हळूहळू. डॉक्टर , मी आणि ऋतु एक कुटुंब आहोतच. पण लौकिक अर्थाने नाही. ऋतु मोठी होईल तिला पंख फुटतीलच. मी आणि डॉक्टर तयार आहोत या क्षणसाठी; पण तिला असे मोठे होताना बघणे हेच थ्रिल आहे, आंनद देणारे आहे. 
त्या गावात राहून सेवा केल्याच त्याला समाधान आहे डॉक्टर म्हणून, त्याच्या तो आनंद मनात साठवून ठेवणे हाच माझा आनंद आहे.
आणि मी असे स्वावलंबीअसणे, आवडते ते काम करणे आणि त्या दोघांवर मनसोक्त प्रेम करणे हेच माझे आयुष्य आहे, आणि त्याच्या मधे त्डॉक्टरची मला साथ आहे. हे सगळेच अव्यवहारी आहे, म्हणून निर्व्याज आहे. 
पुढे मागे चुकुन कोणी आमच्या नात्याना लेबल लावली तरी  त्या वेळी फरक पडणार नाही हे मात्र नक्की. कदाचित ऋतु, मोठी झाल्यावर, ही मागणी करेल सुद्धा. पण त्या वेळी नात्याला नाव असो वा नसों, ही वीण इतकी घट्ट झाली असेल कि फरक पडणार नाही.
 तुला अजुन एक सांगेन आज. मित्र म्हणून तुझे स्थान नेहमीच असेल. आज तुला ज्या मैत्री ची गरज आहे, त्या साठी, मी जमेल तशी मदत करेन.
पुढच्या वेळी आलास तर ऋतु ची अन डॉक्टर ची निवांत भेट घालून देईन. कदाचित तुला कळेल माझे म्हणणे. 
आपल्या नात्यात नेहमीच एक व्यवहार आडवा आला हे दुर्दैव आपले."
ती जे काही बोलेत आहे, ते त्याला कळत नव्हते. तिच्या नकारचे कारण त्याला पटतच नव्हते. असे आयुष्य कोण जगते? ते पण, कोणासाठी? 
किती ही , अतार्किक वाटले तरि पण ते स्विकारण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता
ती मागे फिरली, तिने गाड़ी सुरु केली, रेडियो ऑन झाला, अन त्याच्या कानावर स्वर पडले

हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक ख़ामोशी है, सुनती है, कहा करती है
न ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ एहसास...

कथा समाप्त
©शीतल जोशी
#मराठीकथा #कथा #गोष्ट #maathikatha #marathiblog

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी